Wednesday, April 28, 2010

दिवस सतरावा : (संपूर्ण)

पाखरु तुझ्या प्रतिसादामुळे आनंदित आहे
पण त्या आनंदाला पाखराच्या अश्रूंची नाजूक किनार आहे
सतत कोसळणार्‍या जलधारांप्रमाणे, पाखराचे अश्रू,
सतत तुझ्या आठवणींच्या गर्तेत पडून वहात होते
मात्र पाखराला आज त्या अश्रू वाहण्याबद्दल,
समाधान आहे, कारण...
त्याच अश्रूंनी तर स्वत:चे बलिदान देऊन
तुझी चाहूल पाखराच्या ओंजळीत टाकली.
आज मात्र पाखरु प्रत्येक क्षण
तुझाच विचार करत होतं
तुझ्याशिवाय नवीन जगात पाखराचं मनंच रमत नाहिए
तूच सांग, एकदा लक्ष्मीच्या पाऊलांवर
हृदयकमल अर्पण केल्यावर
जगाच्या पाठीवर पाखरु कोठेही गेलं तरी
त्याचं लक्ष लक्ष्मीच्या पावलांकडे राहणार....नाहीतर कुठे राहणार?
{सागर}

दिवस सोळावा:

पाखरु आजही स्वप्नांच्या दुनियेतच होतं
तुझी चाहूल ही पाखराची जणू
जीवन संजीवनीच ठरली
पाखराच्या मनाची कोंडलेली सारी दारे एकदम
तुझ्या चाहूलीने उघडली गेली
आता मात्र पाखराला खूप हलकं हलकं वाटतंय
जणू अंगावरुन नाजूक मोरपीस फ़िरतंय
आता मात्र पाखराला तुझ्या चाहूलीची अपेक्षा नाहीए, तर
ज्याप्रमाणे क्षितिजावर पसरलेल्या लालीनंतर
सूर्याचे आगमन होते, त्याप्रमाणे आता
तुझ्या चाहूलीनंतर, तुझ्या प्रत्यक्ष दर्शनाची अपेक्षा आहे
पाखरु त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहतंय
ज्या दिवशी तू लक्ष्मीच्या पावलांनी, पाखरासमोर...
प्रकट होशील..........
{सागर}

दिवस पंधरावा:

आज पाखरु खूप आनंदात आहे, कारण
खूप दिवसांपासून दाटलेले निराशेचे ढग
आता हळू हळू दूर होऊ लागले आहेत
आज प्रथमच पाखराला तुझा संदेश मिळाला
जणू त्याला अमृत संजीवनीच मिळाली
ढगांआडून सूर्यकिरणांचे कवडसे पडतात, त्याप्रमाणे
आज प्रथमच तुझी चाहूल जाणवली.
केवळ तुझ्या चाहूल लागण्यामुळेच,
पाखराच्या पंखात आज सहस्त्र हत्तींचं बळ संचारलं
अन आज सर्वत्र ते डौलानं विहरत होतं
लोकंही पाखराच्या या रुपाचं कौतुक करत होते
तूच सांग, केवळ तुझ्या चाहूलीने
पाखरु लोकांच्या नजरेत भरतं, तर
प्रत्यक्ष तू समोर असताना,
पाखराची भरारी का नाही क्षितिजापलिकडे पोहोचणार?
पाखरु तर अशी कित्येक क्षितिजे,
पादाक्रांत करायला तयार आहे, फ़क्त
त्यासाठी पाखराला तुझी सोबत हवी आहे
देशील ना?.....
{सागर}

दिवस चौदावा:

आज पाखरु खूपच निराश झालंय
कारण,
तू म्हणजे पाखराचं सर्वस्व आहे, आणि
त्याच सर्वस्वापर्यंत पाखरु पोहोचू शकत नाहिए
ज्या सर्वस्वाच्या प्राप्तीसाठी पाखरु धडपड करतंय
त्याचे दर्शनदेखील पाखराला दुर्मिळ झालंय
वाळवंटात भरकटलेलं पाखरु तरी काय करणार?
मृगजळाच्या मागे धावणंच त्याच्या नशीबी आहे
प्रत्येक वेळी ते, तू दिसतेस म्हणून धावतं
पण तिथे पोहोचेपर्यंत तुझ्या सर्व पाऊलखुणा
वावटळीत एका क्षणात विरुन जातात
पण तरीही पाखराने अजून आशा सोडलेली नाही
जीवनाच्या अंतापर्यंत पाखरु धावतच राहणार आहे
ते केवळ तुझ्याचसाठी,
कधीतरी या तहानलेल्या पाखराला,
मृगजळामागे धावता धावता,
तुझ्या प्रेमवर्षावात तृप्त होण्याचं
सौभाग्य लाभेल..... आणि
त्याचवेळी पाखराच्या आयुष्याची किनार
तुझ्या सहस्त्रकोटी सूर्यांसम तेजाने
झगमगू लागेल.......
{सागर}

दिवस तेरावा:

पाखराला एक गोष्ट आज जाणवलीय
की, ते तुझ्यापासून दूर राहू शकत नाही
क्षणोक्षणी तुझीच मूर्ती डोळ्यांसमोर उभी असते
आता मात्र पाखराला वेध लागले आहेत
ते तुझ्याकडे झेप घेण्याचे...
कित्येक दिवस तुझी वाट बघण्यात गेले
कित्येक रात्री अश्रूंनी भिजवण्यात गेल्या,
तरीदेखील तुझी चाहूल पाखराला लागली नाही,
अजून किती दिवस पाखरु तुझी वाट पाहणार?
कधी पाखराच्या जीवनक्षितिजावर तुझा सूर्योदय होणार?
{सागर}

दिवस बारावा:

पाखरु अथांग, अनंत क्षितिजाकडे बघत बसलंय
कधीतरी तुझी चाहूल त्या क्षितिजावर जाणवेल म्हणून
पण कित्येक दिवस गेले, रात्री सरल्या
तुझ्या आगमनाची काहीच चिन्हे क्षितिजावर नव्हती
पाखरु खूपच हताश झालंय, निराश झालंय
म्हणूनच सारखे त्याचे डोळे पाणावतात...
सूर्याच्या आगमनापूर्वी जसा क्षितिजावर
उषेचा रक्तिमा पसरतो, त्याप्रमाणे
पाखराच्या जीवनात तुझा रक्तिमा कधी पसरणार?
पाणावलेल्या डोळ्यांमध्ये पुन्हा हास्य कधी फ़ुलणार?
का, पाखराच्या नशिबी कायमची विवंचना लिहिली आहे?
पाखराचे डोळे तुझ्या वाटेकडेच आहेत...
तुझी भेट म्हणजे, पाखराच्या जीवनात
हजारो गुलाबांची फ़ुलं फ़ुलणं, आणि
तुझ्यापासून दूर जाणं म्हणजे, पाखराच्या जीवनात
सूर्यास्त होणं ...........
{सागर}

दिवस अकरावा:

पाखराचं मन खूपच संवेदनशील आहे
कारण, नव्या थव्यात असलं तरी
पाखरु आतून खूपच एकटं पडलंय
दिवसा तर सगळं स्वच्छ दिसत असतं
त्यामुळे पाखरु दिवसभर मुखवटा वापरतं
वरुन सगळ्यांना पाखरु आनंदात दिसतं
पण मुखवट्याआड पाखरु आक्रंदत असतं
ज्याप्रमाणे अमावस्येनंतर चंद्र कलेकलेने वाढत जातो
तशी तुझ्या आठवणींची तीव्रता क्षणाक्षणाने वाढतेय
कधी कधी पाखराला तुझा खूपच राग येतो
कारण "तुझ्याऐवजी" तुझ्या आठवणी त्याच्याबरोबर आहेत.
{सागर}

दिवस दहावा:

पाखरु सध्या भरकटलं आहे, हरवलं आहे
तुझ्यापासून दूरवर गेलं आहे
पण पाखरु एक ना एक दिवस तुझ्यापर्यंत येणार आहे
कारण तुझ्या आठवणींचा दिपस्तंभ
वाट दाखविण्यासाठी पाखराबरोबर आहे
{सागर}

दिवस नववा:

पाखरु सध्या खूप शांत आहे, अस्वस्थ आहे
क्षणोक्षणी तुझाच चेहरा पाखरासमोर असतो
डोळे मिटले तरी आणि डोळे उघडले तरी....
अस्वस्थपणा यासाठी की,
तुझं प्रतिबिंब... मनाच्या पडद्यावर...
पाखरु किती दिवस पाहणार..?
तूच सांग, भक्ताला देवीच्या मूर्तीची अपेक्षा असते?
का प्रत्यक्ष देवीच्या दर्शनाची?
बहुतेक देवी पाखरावर प्रसन्न नाहिए
नाहीतर, पाखराच्या आर्त संदेशाचे
देवीने प्रत्युत्तर दिले असते
पण पाखराची त्याविषयी अजिबात तक्रार नाहिए
तूच सांग, हृदयाच्या मंदिरात देवीची प्रतिष्ठापना केल्यावर
तिच्यावर अविश्वास दाखवायचा प्रश्न येतोच कुठे...?
{सागर}

दिवस आठवा:

आज पाखरापुढे कित्येक प्रलोभने आली,
नाजूक हास्ये आली, लाडीक मुद्रा आल्या
लोकं त्या क्षणांचा आस्वाद घेत होते
पाखरु मात्र केवळ तुझ्याच आठवणींत रमले होते
तुझी आठवण क्षणोक्षणी येतच असते
मनात तुझ्याव्यतिरिक्त कोणतीही प्रतिमा नसते
जेव्हा पाखरापुढे प्रलोभनांचा झगमगाट होतो
तेव्हा पाखरु त्यांच्या आहारी जाऊच शकत नाही
कारण, समोर काहीही आलं तरी
पाखरु त्याची तुलना तुझ्याबरोबर करतं
आणि तुझ्या परिसस्पर्शाच्या तुलनेत, त्याला
इतर गोष्टी समोर असूनही दिसेनाशा होतात.
आता तूच सांग,
पौर्णिमेचा पूर्ण चंद्र समोर चमकत असताना
अमावस्येच्या चंद्राची अपेक्षा कोणी करेल का?
- {सागर}

दिवस सातवा :

पाखरु नेमून दिलेल्या चौकटीत,
मुक्तपणे संचार करतंय...?
भरारी घ्यायचा प्रयत्न करतंय, मात्र
पाखराची भरारी, ही तुझ्यापर्यंतच येऊन थांबेल...
{सागर}

Friday, April 2, 2010

दिवस सहावा:

पाखरु खूपच नाजूक आहे,
हळूवार भावनांमध्ये गुंतलं आहे
क्षणन क्षण तुझाच ध्यास त्याला आहे
म्हणूनच पाखराने प्रत्येक क्षणांवर तुलाच सजविले आहे
आकाशात भरारी घेणार्र्या
दुसर्र्या पक्ष्यांकडे पाहून , पाखराला
हेवा वाटतोय, कारण
ते त्यांच्या विश्वात मुक्तपणे फ़िरत आहेत,
पण पाखराला त्या गोष्टीचा आनंद देखील आहे ...
कारण, पाखराला तुझा परिसस्पर्श झाला आहे
आणि त्या परिसस्पर्शासाठी पाखरु
अशी कित्येक बंधनं स्वीकारायला तयार आहे.
पण हे पाखरु बंधनात राहणारं नाहिए
अजूनही काही जणांचा विश्वास पाखराला जपायचाय
केवळ त्यासाठीच हे पाखरु स्वत:हून बंधनात अडकलंय
आता मात्र पाखराचे सर्व लक्ष
तुझ्याच दिव्य परिसस्पर्शाकडे असेन....
{सागर}

दिवस पाचवा:

पाखरु रात्रभर त्या पूर्ण चंद्राकडे पहात होतं
जणूं, तुझंच प्रतिबिंब त्याला त्यात दिसत होतं
पण त्या पूर्णचंद्राचं मनसोक्त दर्शनही त्याच्या नशिबी नव्हतं
जणू, तुझ्या प्रतिबिंबाचं दर्शनदेखील पाखराच्या नशीबी नव्हतं
{सागर}

दिवस चौथा:

पाखरु एक दिवस भरारी मारणार आहे
तुझ्यापर्यंत एक दिवस येणार आहे
फ़क्त एकच गोष्ट पाखराला अपेक्षित आहे
अन ती म्हणजे तुझा विश्वास ...
तू हा विश्वास जप, आणि पाखरावर विश्वास ठेव
पाखरु कधी ना कधी,
त्या शृंखलांमधून मुक्त होईल
ते ही तेव्हाच साध्य होईल, जेव्हा
तू जपलेला विश्वास, पाखराला जाणवेल
कारण त्याच विश्वासाच्या भरंवशांवर
पाखरु पंख फ़डफ़डवित राहणार आहे...
{सागर}

Thursday, April 1, 2010

दिवस तिसरा:

पाखरु सध्या शांत आहे, स्थितप्रज्ञ आहे
परिस्थितीचा वेध घेतंय ...
एक एक क्षण, कित्येक युगांसारखा वाटतोय, अन्
क्षणोक्षणी मन तुझ्याकडे झेप घेतंय
पण अजूनही पाखरु हतबल आहे
तुझ्यापर्यंत झेप घेण्याइतकं बळ
त्याच्या पंखांत आहे, पण
कितीही बळ पंखांत असलं तरी
शॄंखलांनी बद्ध असलेलं पाखरु
तुझ्यापर्यंत झेप घेऊ शकेल का?
{सागर}

दिवस दुसरा:

पाखराला खूप दूरवर नेण्यात आलंय
कसं सांगू तुला?
त्याच्या झेप घेण्याच्या क्षमतेवर
बंधनं आली आहेत, ... नव्हे लादली गेली आहेत
कदाचित, थव्यामध्ये राहिल्यामुळे,
तुझं मन दुसरीकडे गुंतणं शक्य आहे,
पण ज्याचा थवा म्हणजे
तुझा सहवास होता,
त्या थव्यापासूनच ह्या पाखराला तोडण्यात आलं
आता त्या पाखराला नव्या थव्यात टाकलं
तरीही ते पाखरु एकटेच राहणार आहे
कामचंच ... कदाचित...
तूच सांग, ज्या सर्वस्वासाठी त्या पाखराची सर्व धडपड चालली होती
ते सर्वस्वच त्याच्यापासून हिरावून घेतल्यावर
ते पाखरु तरी काय करणार? .....
{सागर}

दिवस पहिला :

मी खूप दूर भरारी घेतली गं, पण
तेथून परतायला मला जमेल का?
माझे पंख तुझ्या वाटेकडे फडफडताहेत, पण
त्यांना बंधनातून मुक्त होणं जमेल का?
{सागर}

"पाखरु" बद्दल थोडेसे ...

प्रेमाचे कडू आणि  गोड दोन्ही अनुभव घेतलेल्या माझ्या सर्व मित्रांनो आणि मैत्रिणींनो,


पाखरु हा असा कवितांचा संग्रह आहे की , यात प्रियकर प्रेयसीपासून दूर गेलेला आहे. समाजातील अनेक व्यक्तीविशेष या 'ताटा-तूटी'साठी कारणीभूत आहेत. अशा परिस्थितीत प्रियकराला प्रेयसी आणि कर्तव्य या दोघांमध्ये दोलायमान अवस्था होते. अशा प्रियकराच्या भावना टीपण्याचा प्रयत्न करताना मला एकच रुपक आठवले ... "पाखरु"...
पाखराला जशी ओढ असते घरट्याची त्याच आतुरतेने प्रियकराला घरी परतायचे असते त्याच्या प्रियेसाठी. प्रियकर दूर देशी गेला तरी त्याची प्रिया मात्र तिथेच आहे. प्रियकराच्या मनाची ही आंदोलने... स्वतःसाठीच लिहिलेला "पाखरु"  हा  कवितासंग्रह तुम्हाला आनंद देऊन गेला तर मला त्याचे समाधान मिळेन.




(c) २००० - २०१०
सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित 


या कविता संग्रहातील कविता आपण आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवू शकता. परंतु या कवितासंग्रहाचा अथवा संग्रहातील कोणत्याही कवितेचा कोणत्याही व्यावसायिक वा तत्सम कारणासाठी वापर करण्यापूर्वी कविता लेखकाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.


धन्यवाद,
सागर भंडारे
संपर्क : sonerisagar@gmail.com